ती का त्रास करून घेते ?

सकाळचे 6 वाजलेत, अलार्म जोर जोरात वजतोय, नवरा झोपेतच तो बंद करण्याचा सल्ला देतोय पण ती काही अजुन उठत नाहीये. नवरा शेवटी स्वतःच अलार्म बंद करतो आणि झोपून जातो. सव्वा सहा वाजतात आणि परत एक अलार्म होतो. आता मात्र ती पटकन उठाते. अशी की आता नाही उठले तर संपल. लगबगिने ती गीज़र लावते आणि किचन कड़े धाव घेते. एकीकडे फ्रिज मधून भाज्या काढ़ते. पटकन कणिक मळते. एकीकडे भाज्या कपायला घेते. कढ़ई काढ़ते आणि आजचा स्वयंपाक सुरु. नाश्ता आणि जेवन दोन्ही. कारण ती दुपारी ऑफिस मधे असेल मग दोन डब्बे घेऊन जायला हवेत ना! नवरा येतो, म्हणतो “सांग काय मदत करु?” ती म्हणते “काही नही पाणी गरम झाल का बघ.” तो बायकोने सोपावलेली जवाबदारी पार पाडतो. स्वयंपाक झाला की लगेच ती तयार व्हायला जाते. नवरा तिचा डब्बा भरून तयार ठेवतो. आली की लगेच निघायच असत ना तिला! भरभर स्वयंपाक करून बया निघाली सुद्धा आठ वाजता!

आता ऑफिस मधे गेल्यावर तिथे काय काम कमी थोडेच असतात. आणि जेव्हा ती स्वतः टीम मॅनेज करतेय तेव्हा तर ती बॉसच आहे. रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना हो सगळ्यांची तिच्यावर! ती मोठ्या ऑफिस मध्ये काम नाही करत. तिने स्वतःच एक कंपनी सुरू केली आहे तिच्या आधीच्या ऑफिस मधल्या काही मित्र-मैत्रिणीं सोबत. त्यामुळे तिला काम खूप. एका कंपनीला तिला लहान मुलासारखं उभं करायचं असतं संपूर्ण वेळ आणि लक्ष त्यात टाकून. बरं, एरवी भरभक्कम पगाराची नौकरी करायला काही हरकत नव्हती. तरीही तिला स्वतः साठी काम करायचं असतं, पगारासाठी नाही. हो, ती वेगळी आहे तरीही आजच्या मुलींसारखीच महत्वाकांक्षी आहे. पाय जमिनीवर घट्ट रोवून तिला आकाशाला स्पर्श करायचा आहे.

ती कधी दिवसातले नऊ तास काम करते, कधी दहा तर कधी बारा. कधी तिलाच कळत नाही आपण किती वेळ काम करतोय, कधी तिला स्वतःला विचार करावा लागतो, “सुट्टी घेऊ का नको? या शनिवारी मला घरची काही कामं करता येतील का? परवा घरी पाहुणे येणार आहेत. स्वागताची तयारी करायला हवी. मग तिला वाटतं आपण जाता जाता काहीतरी छानसं गिफ्ट घेऊन जाऊ. पाहुण्यांसाठी छान बेत करू. त्यासाठी आजच तयारी करून ठेऊ. मग ऐन वेळी धावपळ नको.” तिचं प्लांनिंग सॉलिड आहे. अर्थात तिला तसं करावंच लागतं नाहीतर तिला कोणाचं अगत्य करायला खूप अवघड होईल. स्वतःची कंपनी असल्यामुळे ती जेव्हा गरज असेल तेव्हा घरून काम करू शकते. त्यामुळे तिला पाहुण्यांसाठी “छोले -भटुरे ” पण बनवता येतात आणि घरकाम सुद्धा मॅनेज करता येतं.

तर दहा तास काम करून-करवून, स्वतः ऐकून-एकवून आणि भयंकर स्ट्रेस झेलून घरी आली की पुन्हा चक्र सुरू ते रात्री झोपेपर्यंत! तिला कुठे आहे उसंत? ती बरेचदा वैतागलेली असते. कधी कारण तिला कळतं, कधी कळत नाही. पण बरेचदा नवऱ्यावर तर कधी स्वतःवर तिचा राग निघत असतो आणि नवरा बायकोचं भांडण होत राहतं. नवरा म्हणतो “यात इतकं रागावण्यासारखं काय? फक्त तेल कमी घालत जा भाजीत इतकंच तर म्हंटलं ना!” तिला वाटतं “वा रे वा! तू कोण मला सांगणारा? रोज मला इथे स्वयंपाक करावा लागतो.”

तुम्ही विचार करत असाल की ही तर रोजची स्टोरी आहे. यात नवीन अस काय? नवीन तस खर तर काहीच नाहीये. प्रत्येक बाई या सगळ्यातून जाणारच! तिच विश्व आता तसंच आहे. मूल झाले की अजून एक नवीन पर्व सुरु होणार आणि सासू सासरे जवळ असले की अजून एक स्टोरी पहायला मिळणार. हो ना?

आता जरा वेळ रिवाइंड करूया आणि या मुलीच्या आयुष्यात ४-५ वर्षा आधी काय चाल्ल होता ते जरा बघुया.

तिने ४ वर्षांपूर्वी एका प्रख्यात महाविद्यालयातून पोस्ट ग्रॅड्युएशन पूर्ण केलं. लग्न होऊन ती दुसऱ्या शहरात राहायला आली जिथे ती कोणालाही ओळखत नव्हती. खरंतर अशी वेळ तिने शिक्षणासाठी कितीतरी वेळा अनुभवली आहे. नवीन शहर तिला नवीन नाही. ती आईबाबांची एकुलती एक मुलगी. आई बाबा स्वतः उच्चशिक्षित असतात. लहानपणापासून तिला ते पुस्तकांची गोडी लावतात, तिला सांगतात, “बाळा, तू खूप छान शिक आणि स्वतःच कर्तृत्व खूप मोठं कर. तू स्वतः परिपूर्ण आहेस. आपण कोणत्याही मुलापेक्षा स्वतःला कमी समजायचं नाही. तुला ज्या क्षेत्रात आवडेल त्या क्षेत्रात जा आणि स्वतंत्र अशी कामगिरी करून दाखव. आयुष्यात खूप मेहनत कर आणि स्वतःच्या जिद्दीवर आणि क्षमतेवर संपूर्ण विश्वास ठेव.”

ती स्वतःच्या कर्तृत्वाचे स्वप्न बघत मोठी होते आणि स्वतःच्या कामगिरीवर ते पूर्ण करण्याचे आश्वासन ती स्वतःला देत असते. तिच्या स्वतःच्या आवडी निवडी असतात – पुस्तकं, नवीन नवीन ठिकाणी फिरणं, अनोळखी लोकांना भेटणे, त्यांची जीवनशैली समजून घेणे, अधून मधून कविता करणे, समाजासाठी स्वबळावर काही तरी करणे आणि बरंच काही. ती अगदी आजकालच्या मुलींसारखी, हॉस्टेल मध्ये ५-६ वर्ष राहिलेली, स्वतः एकटी जगभरात कुठेही प्रवास करणारी, स्वतःचे छंद जोपासलेली, देशभरात भरपूर मैत्रिणीच काय तर मित्र सुद्धा असणारी एक मोकळ्या मनाची आणि स्वच्छंदी मुलगी. तिला घरकामाची फार आवड नव्हती, अर्थात आईने कधी तिला ते करायला सांगितलं नाही स्वतः. आईला बघत बघत मात्र ती स्वतः स्वयंपाक उत्तम करायला शिकली होती पण घरात काम स्वतःला करावं लागेल हा विचार मात्र तिने कधी केला नव्हता.

तिचं लग्न झालं आणि तिच्या आयुष्यात एक पर्व सुरू झालं. तिला कधी नव्हे ते कंटाळा येऊ लागला. ती आयुष्यालाच कंटाळू लागली. तिला त्रास होऊ लागला, घुसमट होऊ लागली. कधीही नं रडणारी ती आता मात्र अश्रू गाळू लागली. कारण तिला स्वतःलाच समजेनासं झालं. तिला वाटू लागलं, “मी इथून पळून जावं. मला नको आहे हे सगळं. मी एकटीच बारी होते, स्वतंत्र होते, स्वच्छंदी होते. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं धैर्य माझ्यात होतं पण हे एकाएकी मला असं का होतंय? का माझी घुसमट होतेय? मला मोकळा श्वास आता कधीच घायला जमणार नाही का? मी कोणापुढे माझं मन मोकळं नाही का करू शकत?” खरं सांगायचं तर तिला कोणालाच बोलायची संधी नव्हती. सासरची सगळी माणसं अगदी नजर लागावी इतकी समजूतदार आणि तिला सांभाळून घेणारी होती. तिचा आणि त्याचा प्रेमविवाह, त्यामुळे नवरा तिला आधी मित्र म्हणून जवळचा होता. तिचा तर बेस्ट फ्रेंड होता तो! मग अचानक तिला त्रास का होऊ लागला? ती का कंटाळते? रागावते? चिडचिड करते? ती काही एकटी थोडेच आहे सगळं मॅनेज करणारी? तिच्या आईने सुध्दा नौकरी केलीच आहे ना? मग तीच का असा विचार करते?

आता अजून एक पिढी रिवाइंड करून बघूया. तिच्या आईच्या वेळी काय परिस्थिती होती ते समजून घेऊ. आईला लहानपानापासून शिकवलं असतं “ही मुलींची कामं आणि ही मुलांची.” आई घरातून बाहेर पडली नौकरी साठी ते घराला गरज होती म्हणून. आईने स्वतः करिअर केलं पण संसाराला प्राधान्य देऊन. मुलीला मात्र तिने मोठं केलं करिअर चे धडे गिरवत. आपली मुलगी घरगुती कामांमध्ये मन तर गुंतवत नाहीये ना, अभ्यासाकडे वा तिच्या छंदांकडे दुर्लक्ष करून या गोष्टीकडे आई बारकाईने नजर ठेऊन असायची. तिचं माईंड कंडिशन झालं ते असं. आता जेव्हा तिला पॅनिक व्हायला होतं, चिडचिड होते, त्रास होतो ते कशामुळे?

तिला अचानक एका मोठ्या बदलला सामोरं जावं लागतंय. तिच्या मनाची तयारी झालीच नव्हती बहुदा. आता जेव्हा तिला रोज घरकाम करावं लागतं, नाती जोपासावी लागतात, स्वयंपाक करावा लागतो आणि या सगळ्यांत एकही चूक होणं तिच्याकडून अपेक्षित नसतं. आता तिचे आईबाबांच तिला फॅमिली कशी इम्पॉर्टन्ट आहे हे सांगतात आणि तिच्याकडून तसं वागण्याची अपेक्षा करतात तेव्हा तिला कुठे जाऊ आणि काय करू हे कळतंच नाही. खरंतर नवऱ्याइतकेच कष्ट तिनेही घेतले असतात शिक्षणासाठी आणि करिअर साठी. मग नवरा तिला जेव्हा प्रेमाने सांगतो, “तू त्रास करून घेऊ नकोस. स्वतः कडे लक्ष दे. करिअर च्या मागे धावून स्वतःची हेळसांड करू नकोस.” तेव्हा तिच्या डोक्यात सणक जाते. “हॉर्मोनल इम्बॅलन्स” ला तिला सामोरं जावं लागतं. नको-नको ती दुखणी मागे लागतात – कंबरदुखी, पोटदुखी, पित्त, सिस्ट, मायग्रेन.

तर ही आजची महिला; खूप कष्ट करणारी, स्वतंत्र आणि महत्वाकांक्षी. तिला स्वतः साठी काम करायला आवडतं. तिला माहिती आहे, तिच्या पगाराला दुय्यम स्थान आहे. तरीही तिला तिचं मन शांत बसू देत नाही. ती सतत झगडत असते. कधी स्वतःशी कधी घराशी तर कधी समाजाशी. तिची मनस्थिती कदाचित तिच्या नवऱ्याला आणि आईला सुद्धा कळणार नाही. तिच्या काळजीपोटी त्यांनी दिलेले सल्ले सुध्दा तिला बोचू लागतात काट्यांसारखे पण ती मात्र मॅनेज करते.

ती कधी स्वतःच सगळी खटपट करते तर कधी दोघे मिळून घर सांभाळतात. एकत्र कुटुंबामध्ये ती असते तेव्हा घरच्यांचाही मदतीचा वाटा मोठा असतो. जिथे शक्य नसेल तिथे तिला मदत घ्यावी लागते. घरकाम दुसऱ्या बाई वर सोपवल्यावर तिला थोडा निवांत वेळ मिळतो आणि एका गरजू बाईला रोजगार दिल्याचं तिला समाधानही मिळतं. दोघी एकमेकींवर ‘डिपेन्डन्ट’ होतात आणि दोघींच्या गरजा पूर्ण होतात. जेव्हा ती मोठ्या पदावर असते, अधिकारी असते, तेव्हा मात्र तिला घरच्यांच्या ‘सपोर्ट’ शिवाय स्वतःच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही. अक्ख घर तिच्या पाठीशी उभं राहिलं तरंच तिला काम आणि परिवार यांचा समन्वय साधणं शक्य होतं.

पण ती हे सगळं का करते? शांतपणे घर नाही का सांभाळू शकत किंवा एखादा साधा जॉब का नाही करत? का तिला स्वतःची कंपनी चालवायची असते? का तिला अधिकारी बनायचे असते? “काय गरज आहे इतका त्रास करून घ्यायची, घर तर नवऱ्याच्या पगारावर चालतंय ना?” तिचा दृष्टिकोन आपण समजून घेतला पण आता थोड्या वेगळ्या नजरेने या गोष्टीकडे बघूया.

तिच्या आईबाबांनी तिच्या मुलगी असण्यामुळे तिच्या शिक्षणात कसर नाही ठेवली. तिला स्वावलंबी बनवलं. तिच्या शिक्षणासाठी भरपूर पैसे तर खर्च केलेच पण स्वतःही कष्ट घेतलेत ती जशी आहे तशी तिला बनवण्यासाठी. वेळ पडल्यास ते नातेवाईकांशी आणि समाजाशी लढायला सुद्धा तयार होते. अशावेळी स्वतःच्या शिक्षणाचा सदुपयोग करणं हे तिचं कर्तव्य नाही का?

आपल्या भारतीय समाजाच्या इतिहासात महिलांना स्थान नव्हतं म्हंटलं तरीही चालेल. “चूल आणि मुलं” इतकचं काय ते त्यांचं जग असं म्हणून त्यांना गृहीत धरल्या जात होतं. समाजाशी लढायची शक्ती त्यांच्यामध्ये आली ती स्वातंत्र्यपूर्व काळात. त्यावेळी अनेक समाजसुधारकांनी “स्त्री शिक्षण” हे स्वतःच्या जीवनाचं ध्येय बनवून घेतलं होतं. त्यासाठी ‘आर्य महिला समाज’, ‘ब्राह्मो समाज’, ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ अशा बऱ्याचशा संस्था उभ्या राहिल्यात. आपणा सर्वांना वंदनीय असे ‘सावित्री बाई फुले आणि जोतिबा फुले’, ‘रमाबाई रानडे आणि महादेव गोविंद रानडे’, ‘महर्षी कर्वे’ समाजाशी पदोपदी लढत होते ते आज मुलींना शिकता यावं आणि समाजात त्यांना बरोबरीचं स्थान मिळावं यासाठीच ना? आज जर तुम्ही आणि मी शिकलो आहोत, आपले विचार व्यक्त करू शकत आहोत आणि मुख्य म्हणजे पुढच्या पिढीला शिकवत आहोत हे त्यांच्यामुळे नाही का? आजची स्त्री कोणत्याची धर्माची वा जातीची असो, स्वतंत्र होते आहे याचं ‘क्रेडिट’ या समाजसुधारकांचं नाही का?

मग आजच्या एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत आणि स्वतंत्र विचारांच्या महिलेचं मागच्या पिढीला हे देणं लागत नाही का कि तिने चांगलं शिकून कर्तृत्व करावं? अर्थात तिला जर घरकाम करण्यात समाधान मिळत असेल तर तिने निर्धास्तपणे कोण काय म्हणेल याचा विचार ना करता ते नक्कीच करावं. पण जिला इच्छा आहे स्वावलंबी राहण्याची, मोठी पदाधिकारी होण्याची वा स्वतःची कामगिरी आवडीच्या क्षेत्रात घडवण्याची, तिच्यासाठी हा ‘त्रास’ नक्कीच नसतो. तिला आवड असते, दोन्ही बाजू मॅनेज करायची. ती स्वतः त्याबद्दल कोणाकडे कधी तक्रार करणार नाही एकदा संसारात पूर्णपणे मुरल्यावर! तिला आनंदच होईल, स्वतः नवऱ्या आणि मुलांसाठी ‘हॉलिडे प्लॅन’ करताना, सासू-सासऱ्यांची आणि आई वडिलांची सेवा करताना आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना स्वतःच्या हाताने ‘पुरणपोळी’ बनवून खाऊ घालताना. पण जर तिला त्रास नको म्हणून किंवा गरज नाही म्हणून काम ना करता घरी बसवण्यात आलं तर, तिच्या स्वप्नांवर, आई बाबांच्या मेहनतीवर आणि इतिहासावर अन्याय होणार नाही का?

पूर्वी लोक असं म्हणायचे “प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते”. आता वेळ आली आहे अजून एक वाक्य म्हणीला जोडण्याची.

“प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते आणि प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे एक खंबीर आणि समजूतदार कुटुंब असतं.”

———

Photo: Author’s (Sharwari Kulkarni) picture clicked at the time of promotion of a program created by her at her work space

One thought on “ती का त्रास करून घेते ?

Add yours

Leave a comment

Start a Blog at WordPress.com.

Up ↑